
अमळनेर (प्रतिनिधी) – अज्ञात चोरट्यानी दोन बंद घरे फोडून सुमारे ७० हजार २०० रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना १२ रोजी रात्री मुंदडा नगरमधील अथर्व बंगलोजमध्ये घडली.
गणेश रामभाऊ पाटील हे आपल्या कुटुंबासह १२ रोजी रात्री ८.३० वाजता आपल्या घराला कुलूप लावून मूळ गावी म्हसले येथे गेले होते. १३ रोजी ते परत आले असता त्यांना लोखंडी गेट उघडे दिसले. तर घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ते लटकवलेले दिसले. तसेच घरातील लोखंडी कपाट आणि लॉकरही तोडलेले होते. या कपटातील दागिने चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. तर, त्याचवेळी त्यांना जवळच राहणाऱ्या अनिल आत्माराम महाजन यांचेही घर फोडल्याचे दिसून आले. अनिल महाजन दे देखील नातेवाईकांकडे पुण्याला घराला कुलूप लावून गेले होते. ही संधी साधत चोरट्याने त्यांचेही घर फोडले. चोरट्यांनी गणेश पाटील यांच्या घरातून २६ हजारांची १३ ग्रॅमची सोन्याची माळ, २४ हजाराची १२ ग्रॅमची सोन्याची माळ, तर अनिल महाजन यांच्या घरातून १६ हजाराची ८ ग्रॅम सोन्याची चेन, २५०० रुपयांचे १ भार चांदीचे देव, १७०० रुपयांचे ३.५ ग्रॅमचे चांदीचे जोडवे असा एकूण ७० हजार २०० रुपयांचा मद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत. घटनास्थळी पो.नि. दत्तात्रय निकम, पो.उ.नि. शरद काकळीज, डीबी पथक यांनी भेट देऊन फॉरेन्सिक पथकाने नमुने घेतले.
वामन नगरमध्येही घरफोडी
पिंपळे रस्त्यावर वामन नगरमध्ये प्रा. लोहार यांच्या घरातून १५ ग्रॅम चांदीचे शिक्के आणि दहा ते १५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरुन नेला आह. तर मुंबईत पोलीस असलेले पी. आर. सूर्यवंशी व व्ही. डी. पाटील यांचेही बंद घरे चोरट्यांनी फोडली आहेत. परंतु, त्या घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान, शहरात बंद घरे दिसल्यास चोरटे संधी साधत आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
















