जळगाव (प्रतिनिधी) : शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या प्रतिभा डिगंबर काळे (वय ४९, रा. इंद्रप्रस्थनगर) यांच्या घरातून चोरट्यांनी २० हजार रुपयांच्या रोकडसह सोने चांदीचे दागिने असा एकूण ५१ हजार ६२६ रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २७ रोजी सायंकाळी घरी आल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या प्रतिभा काळे हे दि. २७ रोजी पहाटे सहा वाजता कुटुंबियांसह शेगाव येथे दर्शनासाठी जाण्यासाठी निघाले. दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते घरी परतले. घराचे कुलूप उघडण्यासाठी त्यांनी पर्समधून चावी काढली, परंतू त्यांना घराला लॉक नसून कडी लावलेली होती. त्यांनी कडी उघडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. तसेच चोरट्यांनी त्यांच्या घरातील गोदरेजच्या कपाटात ठेवलेली रोकड आणि सोने चांदीचे दागिने चोरी झाल्याचे समजले.
गावाला जाण्यापुर्वी ऐवज ठेवला कपाटात
शेगावला जाण्याचे निश्चीत झाल्यानंतर आदल्या दिवशी रात्री प्रतिभा काळे यांनी त्यांच्याजवळ असलेली २० हजारांची रोकड, १ ग्रॅम वजनाचे सोन्याची मणी, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी चांदीचे ताम्हण असा ऐवज घरातील गोदरेजच्या कपाटात ठेवलेला होता. मात्र चोरट्यांनी तो ऐवजच चोरुन नेला.
सीसीटीव्हीची तपासणी
भर दिवसा घरात चोरी झाल्यामुळे प्रतिभा काळे यांनी घटनेची माहिती शहर पोलीसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन चोरट्याचा शोध घेत आहे.
असा चोरुन नेला ऐवज
चोरट्यांनी काळे यांच्या घरातून ८ हजारांचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याची मणी, १५ हजारांचे ३ ग्रॅम वजनाची अंगठी, ८ हजारांची चांदीचे ताम्हण यासह २० हजारांची रोकड चोरुन नेली.
















