धुळे (प्रतिनिधी) शिरपूर शहरातील खालचे गाव बौद्धवाडा येथे मोटारसायकलीवर संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शिरपूर शहर पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून ४ लाख ११ हजार रुपयांच्या ८२३ बनावट नोटा, मोटारसायकल, मोबाईल असा एकूण ५ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी दि. २ रोजी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास गस्त घालीत असताना शिरपूर शहरातील खालचे गाव बौध्दवाडा येथे मोटारसायकल (एमएच १८/ सीओ-८५६७) वर पुंडलिक उर्फ समाधान नथा पदमोर (रा.हट्टी, ता. साक्री), पिरन सुभाष मोरे (रा. चांदपुरी, ता. शिरपूर), रंगमल रतीलाल जाधव (रा. ऐचाळे, ता. साक्री) असे तीन जण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. तिघांना ताब्यात घेवून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी तिघांची अंगझडती व त्यांच्या ताब्यातील बॅग तपासणी करण्यात आली. बॅगेत भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा सापडल्या, त्यांच्याकडून ४ लाख ११ हजार ५०० रुपयांच्या ८२३ नोटा, १० हजार रुपयांचा मोबाईल, १ लाख २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ५ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद अखडमल यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम १८०, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, हवालदार राजेंद्र रोकडे, पोलीस कर्मचारी भटू साळुंके, योगेश दाभाडे, सचिन वाघ यांनी केली आहे.
कसून चौकशी सुरु
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या आहेत. संबंधितांनी या नोटा कुठून छापल्या ? यामागील नेमका मास्टर माईंट कोण? आतापर्यंत किती नोटांची छपाई केली ? बाजारात किती लाखांच्या बनावट नोटा पसरल्या गेल्या आहेत ? त्यांच्यासोबत आणखी किती साथीदार यात सहभागी आहेत? त्यांचे रॅकेट केवळ जिल्ह्यापुरते मर्यादीत आहे की, संपूर्ण राज्यात किंबहुना भारतभर पसरले आहे. याचा शोध घेण्यासाठी शिरपूर पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीत नेमके काय बाहेर येते ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
















