धरणगाव (प्रतिनिधी) शुध्द पाणी हे आरोग्यासाठी आवश्यक असून कोविडच्या आपत्तीत जलजन्य व्याधींचा संसर्ग होऊ नये म्हणून चिंचपुरा ग्रामपंचायतीने आरओए प्लांटच्या माध्यमातून गावकर्यांना शुध्द जल उपलब्ध करून दिलेली सेवा ही उपयुक्त ठरणारी असल्याचे कौतुकोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. ते चिंचपुरा येथील आरओ प्लांट व पेव्हर ब्लॉक कामांच्या लोकार्पणाप्रसंगी बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथे चौदावा वित्त आयोग आणि आमदार निधीतून आर.ओ. जल शुध्दीकरण प्रकल्प आणि गावात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचे लोकार्पण आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जल हे जीवन असून याचा अतिशय जपून वापर करणे आवश्यक आहे. शुध्द जल हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. विशेष करून सध्या सुरू असणार्या कोरोनाच्या आपत्तीमध्ये अन्य विकाराचा संसर्ग होऊ नये म्हणून चिंचपुरा ग्रामपंचायतीने आर. ओ. जल शुध्दीकरण प्रकल्प उभारला असून याचा ग्रामस्थांना लाभ होणार आहे. तर पेव्हर ब्लॉकमुळे चिंचपुरा येथील ग्रामस्थांना सुविधा मिळणार आहे. मतदारसंघाच्या समग्र विकासासाठी आपण कटीबध्द असून चिंचपुरा गावात अजून विकासकामे करण्यात येतील याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.
या कार्यक्रमाला सरपंच आशाताई कैलास पाटील, गुलाब मोरे, शिवाजी पश्चिम महाराष्ट्र नन्नवरे, किशोर पाटील, योगेश पाटील, दिपक पाटील, कैलास पाटील, नामदेव पाटील, संतोष पाटील, गोकुळ पाटील, कृष्णा मोरे हिरालाल पाटील, पोलीस पाटील किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन पोलीस पाटील किरण पाटील यांनी केले. तर आभार सरपंच सौ.आशाताई पाटील यांनी मानले.