जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील माजी सैनिकांचे जिल्हा प्रशासनाकडे असलेले प्रलंबित प्रश्न, तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी तीन महिन्यातून एक दिवस माजी सैनिक दिवस साजरा करण्यात येईल. सैनिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटीबध्द आहे. अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिली.
जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिना (७ डिसेंबर) निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.प्रसाद बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार,सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, माजी सैनिक दिनकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजनिधी संकलन २०२३ चा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, मागील काही महिन्यात जळगाव जिल्हा विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत राज्यात पहिला व दुसरा क्रमांकावर राहिला आहे. ध्वजनिधी संकलनात ही जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माजी सैनिकांच्या प्रलंबित मुद्यांची यादी तयार करून आपण प्रत्येक मुद्दा नियमांच्या चौकटीत सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. माजी सैनिकांसाठीच्या स्वतंत्र कॉलनीची मागणी होत आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात डिफेन्स कॉलनी स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे. अशी अपेक्षा ही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केली.
शंभर टक्के ध्वज निधी संकलित करणारा जळगाव राज्यातील पहिला जिल्हा
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.कासार आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, ध्वजनिधी संकलनाचे दिलेले उद्दिष्टानुसार शंभर टक्के ध्वज निधी संकलित करणारा जळगाव राज्यातील जिल्हा ठरला आहे. शासनाकडून २०२२ मध्ये जिल्ह्यासाठी १ कोटी १८ लाख १२ हजार ४०० रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टापैकी १ कोटी ४५ लाख ७१ हजार ८८२ रूपये इतके असे एकूण १२३.३६ टक्के उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे. २०२३ साठी जिल्ह्याला १ कोटी १८ लाख ०१ हजार ४०० रूपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने २०२२ या वर्षात २९४ लाभार्थ्यांना ३७ लाख ७० हजार ५५८ रूपयांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यात आजपर्यंत शहीद झालेल्या १९ जवानांचे पत्नी, माता व पिता यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्य कु.चेतना गणेश मराठे, कु.महाजन ग्रिष्मा दगाजी, कु.पाटील मानशी शांतराम यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ध्वजनिधी संकलनात शंभर टक्के उदिष्ट पूर्ण करणाऱ्या शासकीय कार्यालयातील प्रमुख म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व शासकीय विभागाच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कल्याण संघटक नितीन पाटील यांनी केले. आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी मानले.