सांगली (वृत्तसंस्था) कवठेमहांकाळ येथील नागेश फाटा येथे गुटख्याच्या पोत्यांनी भरलेले २ ट्रक पकडून १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. पोलीस तपासात अन्न व औषध सुरक्षा विभागाच्या सोलापूर, पुणे व सांगलीतील ७ कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कर्मचारी रोहित पटाले व दर्शन तुरेकर या दोघांनी कवठेमहांकाळ मार्गे गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार परराज्यातून गुटखा घेऊन जाणारे हे दोन्ही ट्रक सांगलीमार्गे अन्य जिल्ह्यात जात असताना पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली.
याप्रकरणी अधिक तपास करताना या गुटख्याच्या तस्करीत सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यातील ७ कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोलापूरचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत शशिकांत कुसेकर यांच्यासह तिपुराया बमनोळी (सांगली), बसवेश्वर कट्टीमनी (सांगली), श्रीशैल्य हाळके (सांगली), पंकज तुरेकर व रोहित पटाले (रा. पुणे) या सात जणांवर गुन्हा दाखल झाला. हा गुटखा कोठे नेला जात होता, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबतचे वृत्त एका दैनिकाने आज प्रसिद्ध केले आहे.