जळगाव (प्रतिनिधी) जळगावमध्ये केळी व कापसावर प्रकिया करणारे उद्योग सुरु करण्यास माझे प्राधान्य राहिल, असे आश्वासन जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिले आहे.
केळीपासूनची अनेक प्रकारची उत्पादने घेणे शक्य !
स्मिताताई पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात केळी व कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र प्रत्येक वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे कापसाच्या भावावर परिणाम होत असतो. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी केळी व कापसावर प्रकिया करणारे उद्योग सुरु करण्यास प्राधान्य देणार आहोत. केळीवर अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग सुरु करता येवू शकतात. केवळ केळीच नव्हे तर केळीची पाने, केळीची साल, केळीचे झाड, केळीचे फुल आदींपासून देखील अनेक प्रकारची उत्पादने घेणे शक्य आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला !
मी जेंव्हा जिल्हा परिषद अध्यक्षा होते, तेंव्हा बचत गटाच्या महिलांना याबद्दल माहिती देवून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला होता. आता तेच प्रयोग मोठ्या स्वरुपात करण्याचा मानस आहे. स्मिताताई वाघ जिल्ह्यात केळी व कापसावर प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित क्षेत्रातील तज्ञ, प्रगतीशिल शेतकरी व उद्योजकांशी चर्चा करुन आरखडा तयार करण्यात येईल. यासंबंधी प्राथमिक माहिती गोळा करण्यात आली असून येणाऱ्या काळात त्याची अंमलबजावणी करण्याचा मानस आहे.
मोदी सरकारमुळे जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंरोजगार व मेक इन इंडियाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यामुळे केळी व कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करण्यास आपल्याकडे पोषक वातावरण आहे. आता मोदी सरकारमुळे जिल्ह्यात विमानतळ सुरु झाले आहे. माल वाहतुकीसाठी अनेक रेल्वे उपलब्ध आहेत या शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात महामार्गाचे जाळे देखील तयार झाले आहे. या तिन्ही मार्गांनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल, यात शंकाच नाही, असेही स्मिताताई यांनी नमूद केले.