
जळगाव (प्रतिनिधी) – जुन्या वादातून नीलेश सदाशिव सोनवणे (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणावर कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री रामेश्वर कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा नीलेश सोनवणे व त्याचा मित्र चेतन मदन नेरकर हे दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री रामेश्वर कॉलनीमध्ये पावभाजी खात असताना तेथे दीक्षांत उर्फ दादू देवीदास सपकाळे, दीपक लक्ष्मण तरटे, आशुतोष उर्फ आशू सुरेश मोरे, सार्थक दीपक लोखंडे (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) हे तेथे आले. त्यावेळी नीलेश याच्यावर कोयता, तलवारीने वार केले. तसेच त्याचा मित्र मध्ये आला असता त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. पुन्हा वार करत असताना ते तरुणाने चुकविले व आरडाओरड केली. त्या वेळी हल्ला करणारे पळून गेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून वरील ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















