नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेत घातलेल्या गोंधळप्रकरणी सोमवारी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. अध्यक्षांच्या या निर्णयाचा विरोध करत या खासदारांनी संसदेबाहेर असणाऱ्या गांधी पुतळ्यासमोर आंदोलनाला सुरुवात केली होती. काल रात्रभर हे आंदोलन गांधी पुतळ्यासमोरच झोपले होते.
रात्रभर आंदोलन करणार आणि निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करत राहणार, असे निलंबित खासदारांनी म्हटले आहे. यानंतर आज सकाळी उभसभापतीच या खासदारांसाठी चहा घेऊन आले. हे चित्र पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. निलंबित खासदारांनी रात्रभर संसदेच्या आवारात धरणे आंदोलन केले. त्यासाठी उशा आणि चादरीही सोबत आणल्या होत्या. खासदारांसाठी गरम होऊ नये म्हणून पंखेही लावण्यात आले. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, डोला सेन, काँग्रेसचे राजीव सातव, रिपन बोरा, नझीर हुसेन, माकपचे के. के. रागेश, इलामारन करीम आणि आपचे संजय सिंह यांच्या निलंबनाचा ठराव सोमवारी राज्यसभेत मांडण्यात आला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभेतील वातावरण प्रचंड तापले होते. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी संबंधित खासदारांची ही कृती निषेधार्ह आणि संसदेच्या प्रतिमेला काळिमा फासणारी असल्याची टीका केली होती.