धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील कत्तल खान्यात तब्बल २२ चोरीची गुरे आढळून आल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. दरम्यान, हे सर्व पशुधन कुसुंबा येथील गो शाळेत रवाना करण्यात आले.
जळगाव शहरातील एमएच १९ कॅफे हॉटेजवळ असलेल्या साईप्लाझा याठिकाणी अपार्टमेंटच्या कम्पाऊंडमधून गुरे चोरीला गेली होती. याप्रकरणी गुरे मालकाने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली होती. चोरीचा हा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. दुसरीकडे भुसावळ शहरातून देखील गुरे चोरीला गेली होती. दोन्ही ठिकाणच्या चोरींमध्ये एकाच संशयितांचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्यानुसार जळगावच्या रामानंदनगर पोलिसांसह भुसावळ पोलिसांकडूनही गुन्ह्याचा तपास सुरु होता. रामानंदनगर परिसरात घटनेत सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर संबंधित गुरे ही पाळधी येथे असल्याचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पथक पाळधीत धडकले.घटनास्थळाचा पंचनामा करुन याठिकाणची गाय, वासरु, गोर्हे, बैल याप्रकाराची एकूण २२ गुरे मिळून आली. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह फौजफाट्यात बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यव्यस्था लक्षात घेता, स्थानिक गुन्हे शाखा, पाळधी, धरणगाव येथील फौजफाटा मागवण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन हे स्व:त परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.