गोंदीया (वृत्तसंस्था) चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (१८ सप्टेंबर) सकाळी १० वाजताच्या सुमारास देवरी- आमगाव मार्गावरील लोहाराजवळ घडली. शैलेश मदन मरस्कोल्हे (२२) असे मृतकाचे तर मदन उईके (३५) रा. कारुटोला, पुराडा, ता. देवरी असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
शैलेश आणि मदन हे दुचाकीवरून हे कारुटोला, पुराडा येथून दुचाकीने देवरीकडे जात होते. दरम्यान, एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शैलेश हा जागीच ठार तर मदन गंभीर जखमी झाला. या मार्गावरून जात असलेल्या नागरिकांनी जखमीला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती देवरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच देवरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमीला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.