धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मलकली,बेलदार गल्ली, पिल्लू मजिंद या भागातील नागरिकांनी आज पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पालिकेवर धडक दिली.
शहरात मागील अनेक दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. आज अचानक मलकली,बेलदार गल्ली, पिल्लू मजिंद भागातील संतप्त महिलांसह नागरिकांनी नगरपालिकेवर धडक दिली. यावेळी पालिकेत मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना फोन केला. त्यानंतर श्री. वाघ यांनी पालिका गाठत पवार साहेबांना फोन लावून महिलांच्या व्यथा मांडल्या व पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले.
शहरातील पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनला लेखी निवेदन दिले होते. तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असतील तर या गोष्टीला जबाबदार कोण?, असा सवाल गुलाबराव वाघ यांनी उपस्थित केला. तसेच तू माझ्याकडे पहा, मी तुझ्याकडे पाहतो, अशी गोष्ट सर्रासपणे पालिका वर्तुळात चालली असल्याचा आरोप देखील श्री. वाघ यांनी केला. यावेळी नगरसेवक जितेंद्र धनगर यांनी माहिलांना शांततेचे आवाहन केले.