
जळगाव (प्रतिनिधी) – कुटुंबियांसह खाटू श्याम बाबांच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या तुषार गोविंदा गायकवाड (रा. गुरुनानक हौसिंग सोसायटी) यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलिसांनी तीन दिवसांपुर्वीच कारागृहातून सुटून आलेल्या समीर हनीफ काकर व सचिन शंकर साळुंखे (दोघ रा. तांबापुर) यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गणपती नगरातील गुरुनाक हौसिंग सोसायटीतील तुषार गायकवाड हे दि. २६ सप्टेंबर रोजी कुटुंबियांसह सुरभी लॉन येथे खाटूश्याम बाबांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अडीच वाजता घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी ३९ हजार ५०० रुपयांची रोकड, १० भार चांदीचे ब्रासलेट, ६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने व ५० हजारांचे दोन महागडे फोन, कपडे, कॉस्मेटीक साहित्य असा एकूण १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तपासधिकाऱ्यांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि वारुंगसे, उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुमेध इंधाटे, मुकुंद गवते यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
चोरलेले कपडे घालून फिरत असतसांना आवळल्या मुसक्या
सीसीटीव्हीत पोलिसांना तीन दिवसांपुर्वीच एमपीडीएतंर्गत झालेल्या कारवाईत कारागृहातून सुटून आलेल्या समीर हनीफ काकर व त्याचा साथीदार सचिन साळुंखे हे दोघ दिसून आले. ते संशयित दुसऱ्या दिवशी चोरलेले कपडे घालून फिरत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.















