
जळगाव (प्रतिनिधी) – शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी तरसोद बायपासवर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दि.१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता तरसोद फाट्याजवळ घडली. समाधान रमेश बाविस्कर (वय ३५, रा. कांचन नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान बाविस्कर हे रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून तरसोद फाट्याकडून जात होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की, समाधान बाविस्कर यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर संबंधित ट्रकचालकाने वाहन न थांबविता घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पोलिसांनी अपघाताची माहिती घेतली. फरार ट्रकचालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे बाविस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कांचन नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.















