जळगाव (प्रतिनिधी) नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणीला काही इसमांनी बांग्लादेशमधून कोलकत्ता येथे आणले. तेथून त्या तरुणीला मुंबईला काही दिवस ठेवत तिला नाशिकला पाठवले. याठिकाणाहून तरुणीने मोबाईलवरुन लोकेशन पाठवले. त्यानुसार कुटुंबियांनी हा प्रकार एका सामाजिक संस्थेला सांगितला आणि त्यांच्याकडून तरुणीचा शोध घेतला जात होता. ती तरुणी नाशिकहून जळगावात आल्यानंतर तिला देहविक्रीसाठी परावृत्ती करण्यापुर्वीच त्या बांग्लादेशी तरुणीची पोलिसांच्या मदतीने सुटका झाली.
शहरातील प्रोफेसर कॉलनीत एका बांग्लादेशी महिलेला डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पुणे येथील फ्रिडम फर्म या संस्थेला मिळाली होती. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत घरात देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या बांग्लादेशी तरुणीची सुटका करण्यात आली. तर देहविक्रीचा व्यवसाय चालविणाऱ्या पुजा आत्माराम जाधव या महिलेला ताब्यात घेत तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. त्या बांग्लादेशी तरुणीची आशादीप वस्तीगृहात रवानगी करण्यात आली. तर संशयित पुजा जाधव या महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे करीत आहे.
देहविक्रीच्या व्यवसायात ओढण्याचा होता डाव तरुणीने लोकेशन शेअर केल्यामुळे आपल्या अडचणी वाढतील, म्हणून डांबून ठेवलेल्या महिलेने तरुणीला दोन दिवसांपुर्वी जळगाव येथे पुजा जाधव या महिलेकडे पाठवले. रात्री दहा वाजेच्या सुमारास ती कारने जळगावला आली. याठिकाणी पुजा जाधव महिलेच्या घरात तिला डांबून ठेवले होते. तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसायात ढकलण्याचे त्यांचा डाव होता, मात्र त्यापुर्वीच पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला.
रॅकेट शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणींना भारतात आणल्यानंतर त्यांना इतरत्र पाठविले जाते. त्यानंतर त्या तरुणींना डांबून ठेवत त्यांचा छळ करुन जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले जाते. हे संपुर्ण रॅकेट सक्रीय असून ते रॅकेट शोध घेण्याचे आवाहन पोलिसांपुढे असून त्यानुसार त्यांचा शोध घेतला जात आहे.