जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या १२ पैकी ९ आरोपींना न्यायालयात हजर केले होते. यावेळी संशयितांची १० दिवस पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी काही महत्वपूर्ण कारणे न्यायालयाला सांगितली. त्यात आर्थिक अपहार व गैरव्यवहार संगनमताने व पूर्व नियोजित कटाने झाला आहे. अटक आरोपींचा गुन्हयातील यापुर्वी अटक आरोपी व पाहिजे असलेल्या आरोपींसोबत काय संबंध आहे?, अटक आरोपींनी स्वत:च्या बँक खात्यातुन ठेवीदारांव्यतिरिक्त इतर कोणास आरटीजीएस, एनईएफटी किंवा चेकव्दारे पैसे दिले आहेत काय? यासह पुरावे गोळा करण्यासाठी विविध जिल्हयात तपासकामी आरोपीसह जावून तपास करणे आवश्यक असण्यासह तब्बल १७ गंभीर कारणांचा समावेश आहे.
अटक आरोपीची पोलीस कोठडी मिळण्याची कारणे
१) आरोपींनी बीएचआर पतसंस्थेतून कर्जाच्या नावाखाली घेतलेली रक्कम परतफेड न करता वेगवेगळया ठेवीदारांच्या ठेवी कमी किमतीत घेवून स्वत:चे पुर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. सदर कटामध्ये आरोपी सोबत कोणकोण सामील आहे याचा तपास करणे आहे.
२) अटक आरोपी यांनी ठेवीदारांच्या ठेवपावत्या गोळा करण्यासाठी नेमलेले एजंट नामे अनिल पगारीया, संतोष बाफना, अशोक रूणवाल, शिरीष कुवाड, अतुल गांधी व चव्हाण यांचे व्यतिरिक्त अजून कोण होते व त्यांचा नमूद गुन्हयात सहभाग काय आहे याबाबत तपास करणे आहे. तसेच वरील एजंट यांचेकडे देखील आरोपी समक्ष चौकशी करणे आवश्यक आहे.
३) अटक आरोपींनी या गुन्हयातील इतर आरोपी नामे सुनिल देवकीनंदन झंवर, सुरज सुनिल झंवर, महावीर जैन, जितेंद्र कंडारे, सुजित वाणी, विवेक ठाकरे इ. यांचेशी संगनमत करून गुन्हा केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक आरोपीची भुमिका कशी होती याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद आरोपी यांची कर्जखाती निरंक करण्यामागे संबंधितांचा काय सहभाग आहे याचा सखोल तपास करणे आहे.
४) नमूद गुन्हयातील आरोपी नामे सुनिल झंवर व सुरज झंवर यांचे कार्यालयात मिळालेल्या संगणकावरील डाटामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचेशी नमूद अटक आरोपींचा काय संबंध आहे हे तपासात निष्पन्न करणे आहे.
५) नमूद गुन्हयातील यापूर्वी अटक केलेले व पाहिजे आरोपीचे ऑफीसमधून मोठया प्रमाणावर दस्तऐवज जप्त करण्यात आलेले असून त्यामध्ये काही दस्तऐवज वरील अटक आरोपी याचेशी संबंधित आहे. नमूद दस्तऐवजा बाबत आरोपीकडे तपास करणे आहे.
६) सदर आरोपी यांचे कर्ज बेकायदेशीररित्या निरंक करण्याच्या गुप्त कटामध्ये अजून कोण कोणत्या व्यक्ति होत्या याबाबत नमूद अटक आरोपीकडे तपास करणे आहे.
७) यापूर्वी अटक व पाहीजे आरोपी हे बीएचआरच्या मुख्य ऑफीसमध्ये येत होते. त्यांचेत झालेल्या मिटींगमध्ये विविध कर्जप्रकरणांची तडजोड करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले असून सदर बाबत वरील नमूद अटक आरोपीकडे तपास करणे आहे.
८) सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असून मोठया प्रमाणावर आर्थिक अपहार व गैरव्यवहार संगनमताने व पूर्व नियोजित कटाने झालेला असून आरोपींचे गैरवर्तन पाहता व संस्थेत केलेल्या बेकायदेशीर नोंदी व इतर गैरव्यवहार याबाबत वरील नमूद अटक आरोपींचा गुन्हयातील यापुर्वी अटक आरोपी व पाहिजे असलेले इतर आरोपी बरोबर काय संबंध आहे याबाबत तपास करणे आहे.
९) वरील नमूद आरोपींचे कर्ज निरंक च्या खोटया नोंदी जितेंद्र कंडारे, सुजित वाणी यांनी केल्या आहेत. याबाबत या आरोपींकडे गुन्हयातील आरोपी जितेंद्र कंडारे, सुजित वाणी यांचेशी काय संबंध आहेत, काय आर्थिक व्यवहार झाले आहेत याबाबत तपास करणे आहे. तसेच याबाबतचा गुप्त कट कोठे रचला गेला, त्यामध्ये अजुन कोणत्या व्यक्ती सामील होत्या याबाबत जाणून घ्यायचे आहे.
१०) सदर अटक आरोपींच्या बँक खात्यांची/गुंतवणुकींची व मालमत्तेची माहिती प्राप्त करणे असल्याने त्याबाबत त्यांचेकडे तपास करणे आहे.
११) ठेवीदारांनी त्यांची पावती २० ते ४० टक्के किमतीमध्ये देण्याची परिस्थिती सदर अटक आरोपींनी निर्माण केली व ठेवीदारांकडून कोन्या स्टॅम्पपेपरवर सह्या घेवून त्यांची रक्कम तथाकथित कर्जदार यांच्या खात्यात संपूर्ण व्याजासहीत वर्ग करावी असा खोटया आशयाचा मजकूर प्रतिज्ञापत्रावर लिहण्यात / टाईप करण्यात आला. याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे. तसेच स्टॅम्पपेपर कोठून खरेदी केले, त्याच्या नोटरी कोठे केल्या, त्यांच्या मिटींग कोठे होत होत्या याबाबत त्यांचेकडे तपास करणे आहे.
१२) अटक आरोपींनी काही ठेवीदारांना रोख रक्कम दिली आहे तसेच कर्ज निरंक करताना रोखीने व्यवहार केल्याबावत यापुर्वी जप्त केलेल्या कागदपत्रामध्ये पुरावे मिळून आलेले आहेत. सदरची रोख रक्कम त्यांनी कोठून आणली याबाबत त्यांचेकडे समक्ष तपास करणे आहे.
१३) गुन्हयामध्ये मोठया प्रमाणावर खोटा दस्तऐवजी पुरावा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा दस्त ऐवजी पुरावा कोठे बनविण्यात आला. याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद अटक आरोपींचे हस्ताक्षर नमुने घेवून हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवून अभिप्राय प्राप्त करणे आहे.
१४) आरोपी हे जळगाव, मुंबई व औरंगाबाद येथील रहिवासी असुन त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी वर्ग करुन घेतल्या आहेत त्यामुळे पुरावे गोळा करण्यासाठी विविध जिल्हयात तपासकामी आरोपीसह जावून तपास करणे आवश्यक आहे.
१५) वरील नमूद अटक कर्जदार आरोपी यांना त्यांचे गैरकारभारासाठी ठेवीदार यांची माहिती पुरविणाऱ्या इसमांबाबत त्यांचेकडे तपास करून अशी माहिती पुरविणाऱ्या इसमांकडे तपास करणे आहे.
१६) सदर गुन्हयात पाहिजे आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर व अठक आरोपी महावीर जैन, सुजित वाणी यांनी वर नमूद अटक आरोपी पैकी कोणाकोणाची कर्ज प्रकरणे निरंक केली आहेत. याबाबत उपलब्ध कागदपत्रावरून नमूद अटक आरोपींकडे चौकशी करून तपास करणे आहे.
१७) वरील नमूद अटक आरोपी यांनी स्वत:चे बँक खात्यातुन ठेवीदारांव्यतिरिक्त इतर कोणास आरटीजीएस, एनईएफटी चेक याव्दारे पैसे दिले आहेत काय? त्या संबंधीत लोकांकडे तपास करून त्यांचा गुन्हयात कितपत सहभाग आहे याबाबत तपास करणे आहे.
१८) वरील अटक आरोपी यांचे इतर कोणी सहकारी आहेत का? याबाबत आरोपींकडे तपास करून त्यांचाही शोध घेवून अठक करणे आहे. तरी वरील नमुद कारणांकरीता अटक आरोपींची १० दिवस पोलीस कस्टडी मिळणेस विनंती आहे.
















