धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावाजवळ दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू जंगलू कुंभार रा. ममुराबाद ता.जळगाव ह.मु. जळोदरोड अमळनेर असे मयत दुचाकीस्वराचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बापू कुंभार हे आपल्या पत्नीसह अमळनेर तालुक्यातील जळोद रोडवरील वीटभट्टीवर वास्तव्याला होते. मजुरी काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी २४ जून रोजी रात्री ११.३० वाजता बापू कुंभार हे त्यांची दुचाकी (एमएच १९ बीझेड ९१६२) ने सुनसगावकडून अमळनेर शहराकडे निघाले होते. रस्त्याने जात असतांना धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बापू कुंभार या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी त्यांची पत्नी प्रीती कुंभार यांनी गुरुवारी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ अर्जुन कुवारे हे करीत आहे.