जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोदावरी आय. एम. आर. कॉलेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून प्रशासकीय अधिकारी मयुर हेमराज पाटील यांच्या कक्षासह अकाउंट विभागातून १ लाख रुपये रोख रक्कम आणि सीसीटीव्ही स्टोरेजचे (एनव्हीआर) असा एकूण १ लाख ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी १९ जून रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. हा प्रकार कॉलेजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मयुर पाटील (वय ३५, रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) हे गोदावरी आय. एम. आर. कॉलेजमध्ये २०११ पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली कॉलेजचे अकाउंट विभाग, प्राचार्य कक्ष, एम. ओ.डी. कॅबिन, शाखा प्रमुखांचे कक्ष यासह इतर अनेक महत्त्वाचे विभाग येतात. १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर सर्व विभाग व्यवस्थित बंद करून कॉलेजचे मुख्य गेट सुरक्षा रक्षक हरीचंद्र पाटील यांच्याकरवी कुलूप लावून बंद करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हरीचंद्र पाटील यांनी रात्रपाळीचे सुरक्षा रक्षक दीपक अनिल पाटील यांच्याकडे कामकाज सोपवून ते देखील निघून गेले होते.
शनिवारी १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मयुर पाटील घरी असताना, कॉलेजमध्ये चोरी झाल्याचे समजले. मयुर पाटील यांनी तात्काळ कॉलेजला जाऊन पाहणी केली असता, अकाउंट विभागातील लेखापालाच्या काउंटरवरील कपाटात ठेवलेली विद्यार्थ्यांच्या अॅडमिशन फीची रोख रक्कम १ लाख रूपये गायब असल्याचे निदर्शनास आले.
तसेच, कार्यालयातील फाईल्स व इतर दस्तऐवज फेकलेले, कपाटे व काउंटर वाकवून नुकसान केलेले आणि सीसीटीव्ही स्टोरेजचे हाईव्हिजन कंपनीचे एन. व्ही. आर. गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे
पैशांसह महत्त्वाचे फाईल्स लंपास
पाहणी केली असता, अकाउंट विभागातील लेखापालाचे काउंटर आणि कपाटातून विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची जमा केलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. यासह ५ हजार रुपये किमतीचा हायव्हिजन कंपनीचा सीसीटीव्ही एन. व्ही. आर. देखील चोरून नेण्यात आला होता. चोरट्यांनी कपाटे व काउंटरचे मोठे नुकसान केले होते, तसेच कार्यालयातील फाईल्स व इतर दस्तऐवज अस्ताव्यस्त फेकले होते.
शाळेतही चोरीचा प्रयत्न
दरम्यान, जवळच असलेल्या गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) च्या अकाउंट ऑफिसमध्येही चोरट्यांनी घुसखोरी केली, तेथील कपाटे आणि साहित्याची फेकाफेकी केली; मात्र सुदैवाने तेथून कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही.