
जळगाव, प्रतिनिधी : बंद दुकानाचे शटर रॉडने उचकवून दुकानातून रोख १ लाख ७५ हजार २५० रुपये चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना दि. ६ ऑक्टोबर रोजी पहाटे विसजनजी नगरात घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणपती नगरातील व्यावसायिक मयूर पुरुषोत्तम मंडोरे (वय ४१) यांचे विसनजी नगरमध्ये मयूर ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी पहाटे हे दुकान बंद असताना चोरट्यांनी रॉडने शटर उचकवून दुकानात प्रवेश केला. त्या वेळी दुकानातून ८८ हजार १२५ रुपयांची चिल्लर व नोटा अशी एकूण १ लाख ७५ हजार २५० रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मयूर मंडोरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करत आहेत.

















