
जळगाव (प्रतिनिधी) – अमळनेर येथे भरलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र-२०२६’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनात जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी शुक्रवारी नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्युत सुरक्षा, वीजबचत, सौरऊर्जेचा वापर आणि महावितरणच्या विविध योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे ‘प्रगतिशील महाराष्ट्र-२०२६’ प्रदर्शन अमळनेर येथील कलागुरू मंगल भवन येथे भरवण्यात आले. या प्रदर्शनातील महावितरणच्या दालनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी भेट दिली. यावेळी खासदार स्मिता वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुलाणी यांनी विजेचा सुरक्षित वापर, विद्युत अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि दैनंदिन जीवनातील वीजबचतीचे महत्त्व विशद केले. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजना यांची माहिती दिली. स्मार्ट मीटरचे फायदे सांगून विद्यार्थ्यांनी ही माहिती आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांचा योजनांमधील सहभाग आणि ऊर्जा विषयक जागरूकता वाढविण्यासाठी महावितरणच्या दालनात प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वीजसुरक्षा आणि ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सांघिक कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी प्रवीण स्थूल, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, अमळनेरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर, उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, सहायक अभियंते हितेंद्र बढे, विनायक बोरसे, हेमंत सैदाणे यांच्यासह महावितरणचे अधिकारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.
















