वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे जागतिक पातळीवरही पडसाद उमटत आहे. अमेरिकेत या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात भारतीय वंशाच्या नागरिकांनी मोर्चे काढले. आंदोलनच्या एक दिवसआधी शिकागोमध्ये शीख-अमेरिकन समुदायाच्या लोकांनी एकत्र येऊन भारतीय दूतावासासमोर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी पोस्टर, बॅनर निदर्शकांनी झळकावले.
कॅलिफोर्नियातील विविध भागात भारतीय शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन झाले. त्याशिवाय इंडियानापोलिसमध्ये ही आंदोलन करण्यात आले. शेतकरी देशाचा आत्मा आहे. आपल्याला आत्म्याचे रक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे आंदोलक गुरिंदर सिंग खालसा यांनी म्हटले. अमेरिका, कॅनडासह जगातील इतर देशातही भारतातील कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. भारतातील या कायद्यामुळे शेती आता खासगी क्षेत्रासाठी उघडण्यात येणार आहे. मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांना याचा फायदा होणार आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा यावेळी आंदोलकांच्यावतीने करण्यात आला. सॅन फ्रान्सिको येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर काढण्यात आलेल्या मोर्चामुळे ‘बे ब्रिज’वरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, भारत सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावे असा आमचा आग्रह नसून मागणी असल्याचे शीख समुदायाचे नेते दर्शन सिंग दरार यांनी सांगितले.