
जळगाव (प्रतिनिधी) – इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने चॉपरने प्राणघातक हल्ला केला. शहरातील अयोध्यानगरातील शाळेत ही धक्कादायक घटना शुक्रवारी दि.७ ऑगस्ट रोजी घडली. जखमी विद्यार्थ्याला प्रत्यक्षदर्शीनी तात्काळ जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविले. त्यानंतर अधिकच्या उपचारार्थ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकराने पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
एमआयडीसी परिसरातील एका शाळेत हा विद्यार्थी इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या शाळेतील एका शिक्षकाकडे त्याने क्लासही लावलेला आहे. आज सकाळी सात वाजता नेहमी प्रमाणे तो शाळेत गेला होता. सकाळी १०.३० वाजता शाळा सुटल्यानंतर हा मुलगा रस्त्याने घरी जात होता.मागुन येत केला प्राणघातक हल्ला
शाळेच्या मंदिर परिसरातून तो जात असताना त्याच्या वर्गातील एका विद्यार्थ्यांने त्याच्या मागुन येत या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. बरगडीत चॉपरचा वार होताच रक्कबंबाळ झालेला विद्यार्थी जागेवर कोसळला. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत त्याला उचलुन जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. प्राथमिक उपचाराअंती डॉक्टरांना त्याचा रक्तस्त्राव थांबविण्यात यश मिळाले. त्यानंतर अधिकच्या उपचारासाठी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.
आई वडिलांची रूग्णालयात धाव
जखमी विद्यार्थ्यांचे आई वडील यांच्यासह नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत मुलाच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती जाणुन घेतली. दरम्यान पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी जखमी मुलाची विचारपुस करुन घटना जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.
शाळेत दप्तर तपासणी व्हावी
जखमी मुलाच्या पालकाने सांगितले की, हा हल्लेखोर मुलगा गुन्हेगारी स्वरुपाचा असुन अशी पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांच्या दप्तर शाळेत नियमित तपासली गेली पाहिजेत. शाळेत येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळा प्रशासनाने अधिक सजग होणे गरजेचे आहे. दप्तरमध्ये चॉपर ठेऊन शाळेत विद्यार्थी येत असेल तर ही गंभीर बाब असुन पालकांची झोप उडविणारा हा प्रकार आहे. माझा मुलगा हा हल्ल्या सुदैवाने बचावला आहे. अशा घटनेच्च पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून उपान योजना केली जावी, अशी अपेक्षा त्यांन व्यक्त केली.
शिक्षकांसमोरच दिली होती धमकी
जखमी विद्यार्थ्याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा क्लासला गेला होता. त्याठिकाणी शाळेतील दुसऱ्या मुलाशी मुलाचा किरकोळ वाद झाला होता. तेव्हा त्याने त्यांच्या मुलाला मारहाण करुन जमिनीवर पाडले होते. हा प्रकार कळाल्यानंतर त्याची समजूत घातली असता पालक आणि शिक्षकांसमोर त्याने माझ्या मुलास तुला पाहुन घेईल, अशी धमकी दिली होती. या मुलास वेळीच आवर घातली गेली असती तर या घटनेला स्वरुप मिळाले नसते.
















