धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विवरे गावात महामानव – भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंती महोत्सवाचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक हेमंत माळी यांनी करून वक्त्यांचा परिचय करून दिला.
या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून RTI चे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते व मान्यवरांच्या हस्ते कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रंजना ढिवरे व शेनपडु ढिवरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
जयंती महोत्सवाच्या सुरुवातीला निकिता ढिवरे, वैशाली ढिवरे, आकाश ढिवरे, अंजली सोनवणे, शिवानी भालेराव यांनी भीमगीते सादर केले. प्रशांत सोनवणे याने नाल हे वाद्य वाजून गितास चाल दिली. निकिता ढिवरे व विशाल ढिवरे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्य विषयी मनोगत व्यक्त केले. शितल ढिवरे यांनी माता रमाई यांच्या जीवनावरील एक विशेष गीत सादर केले व श्रोत्यांच्या अश्रूंचा बांध तुटला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पी.डी.पाटील व हेमंत माळी यांनी बाबासाहेबांच्या जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य विशद केले. बाबासाहेब जगातील पाच विद्वानांपैकी प्रथम होते. बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी चार मुलं गमावली. बाबासाहेबांनी लहानपणी जातिभेद सोसला, पाण्यासाठी, मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानत रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृति ग्रंथाचे दहन केले. बाबासाहेबांचे गुरु तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले होते. बाबासाहेबांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकून विविध उदाहरण दाखले देऊन त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. बाबासाहेबांचा जयंती महोत्सव १५२ देशात साजरा केला जातो. महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
या जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र सोनवणे, धनराज पाटील, दिलीप पाटील, गणेश पाटील, गोकुळ माळी, आधार माळी, किरण देशमुख, गुलाब माळी, ज्ञानेश्वर माळी, महिला बचत गट विवरे, तरुण मित्र मंडळ विवरे यांनी परिश्रम घेऊन अनमोल सहकार्य केले. या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील तर आभार जयश्री पाटील यांनी केले. जयंती महोत्सवाची सांगता तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन गोड खीर देऊन करण्यात आली. व शेवटी वंदना गाऊन समारोप करण्यात आला.