
जळगाव, प्रतिनिधी : मोटारीचे बटन का बंद करतो आहेस असे विचारल्याचा राग आल्याने प्रदीप केशव सुर्यवंशी (वय १९, रा. म्हसावद, ता. जळगाव) या तरुणासह त्याच्या वडीलांना लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता म्हसावद गावात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील म्हसावद गावात प्रदीप केशव सुर्यवंशी (वय १९) हे वास्तव्यास असून त्यांचे ग्रामपंचायतीसमोर घर आहे. त्यांनी नळाचे पाणी भरण्याकरीता मोटारीचे बटन चाकू करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले असता, बटन बंद होते. ते पुन्हा चालू केले असता संशयित निखिल सुर्यवंशी याने ते बंद केले. दरम्यान, प्रदीप सुर्यवंशी याने तू मोटारचे बटन बंद का करतो आहेस असे विचारले. यावेळी संतापलेल्या निखीलने घरातून लोखंडी रॉड आणला आणि त्याने प्रदीप सुर्यवंशीसह त्याच्या वडीलांना मारहाण केली. तसेच हातातील कड्याने प्रदीपवर वार करुन जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात निखिल सुनिल सुर्यवंशी (रा. म्हसावद, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.
















