नंदुरबार (प्रतिनिधी) महावितरणच्या कृषी वीज धोरणात तळोदा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी निसारअली मक्रानी यांनी दोन आठवड्यांपूर्वी २० कृषिपंपांचे वीजबिल भरून उरलेल्या पंपांचे बिल लवकरच भरण्याचे आश्वासन दिले होते. याची वचनपूर्ती करताना त्यांनी शनिवारी उरलेल्या ९ पंपाचेही बिल भरले. एकूण २९ कृषिपंपांचे तब्बल २२ लाख २३ हजार रुपये बिल भरून ते थकबाकीमुक्त झाले. याबद्दल महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी तळोद्यात येऊन निसारभाईंचा सन्मान केला.
हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी हे महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी आहेत. तळोद्यासह तालुक्यातील दलेलपूर व प्रतापपूर येथे ते स्वतःच्या शेतीसह इतर काही लोकांची भाड़ेतत्वावर शेती करतात. या शेतीच्या सिंचनासाठी सर्व ठिकाणी एकूण २९ कृषिपंप वापरत आहेत. ते नेहमी महावितरणला सहकार्य करतात, मात्र काही कारणाने या पंपांचे वीजबिल थकित होते. कृषी वीज धोरणात मिळणाऱ्या भरघोस सवलतीसह इतर लाभ समजून घेतल्यानंतर त्यांनी १२ मार्च रोजी २० वीजबिलांची १५ लाख २३ हजार ७० रुपये थकबाकी भरली होती. उर्वरित पंपांच्या बिलांची ७ लाखांची थकबाकी २५ तारखेनंतर भरण्याचे आश्वासन दिले होते.
शनिवारी (२६ मार्च) महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे व नंदुरबार मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्या उपस्थितीत निसारअली मक्रानी यांनी ९ बिलांचे ७ लाख रुपये भरले. दोन टप्प्यांत त्यांनी २९ बिलांची २२ लाख २३ हजार ७० रुपये रक्कम मागील १४ दिवसात भरली. विशेष केवळ स्वतःचे बिल भरून ते थांबले नाहीत, तर परिसरातील इतर गावांत जाऊन लोकांना कृषी वीज धोरण समजावून सांगत आहेत आणि त्यांना वीजबिल भरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. निसारभाई महावितरणला करत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्य अभियंता कैलास हुमणे व अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्य अभियंता हुमणे यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. निसारभाईंचा आदर्श घेऊन सर्व शेतकऱ्यांनी वीजबिलांची थकबाकी भरण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कृषीसह सर्व वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यास महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही हुमणे यांनी दिली. कृषी वीजबिल वसुलीसाठी मेहनत घेणारे कार्यकारी अभियंता अमित शिवलकर, उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील, सहायक अभियंता चेतन पाचपांडे, कनिष्ठ अभियंता विलास गुरव, तंत्रज्ञ बी एन. राजपूत, ए.एच. कलाल, आनंदसिंग गिरासे यांचे हुमणे यांनी कौतुक केले.