जळगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात (एस.एन.डी.टी) एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ मुंबईच्या ७१ व्या दीक्षांत समारंभानिमित्त पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जैन ट्रेडर्स अँड काका पी.व्ही.सी चे देवेंद्र लोढा हे उपस्थित होते. तर संस्थेचे अध्यक्ष प्रा.ऐ.पी. चौधरी यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते.
विद्यार्थिनींना संबोधित करताना लोढा यांनी विद्यार्थिनींना आपल्या पदवीचे आणि ज्ञानाचे उपयोजन करून आयुष्यात यशस्वी होत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपले भरीव योगदान देण्याचे आव्हान केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष ऐ.पी. चौधरी म्हणाले, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नकारात्मक गोष्टींना दूर ठेवून, भूतकाळ विसरून भविष्यभिमुख झाले पाहिजे. आपल्या हिम्मतीने स्वतःची वेगळी वाट निर्माण केली पाहिजे असे सांगुन शेवटी त्यांनी युक्रेनमधील युद्धाचा संदर्भ देत सौंदर्य वतीने देशासाठी बंदूक उचलून शौर्य गाजविले याचा हवाला देत आपणही यापासून धडा घ्यावा असे सूचित केले.
समारंभाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करून पदवीप्राप्त विद्यार्थिनींना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी विचार मंचावर उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव, डॉ. किशोर नेहतेही उपस्थित होते. यावेळी ५४ विद्यार्थिनींना बीएची पदवी प्रदान करण्याबरोबरच ब्युटी पार्लर व प्रश्नमंजुषा यातील यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनय पाटील, डॉ. एच. व्ही चव्हाण यांनी तर आभार डॉ. किशोर नेहते यांनी मानले.