जळगाव (प्रतिनिधी) घरातील पुरुष कामावर आणि महिला बजारात गेल्या असतांनाच अवघ्या पाऊण तासातच चोरट्यांनी आकाशवाणी रोडवरील युनियन बँके शेजारील निलेश अपार्टमेंट मधील बंद फ्लॅट फोडून ४१ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, आकाशवाणी रोडवरील युनीयन बँकेशेजारी निलेश अपार्टमेंटमध्ये शाम जेसुमल झांबा (वय- ४०) हे वडील आई, पुतलीबाई, पत्नी कुमकुम व लहान भाऊ सुरजमल व लहान बहिण कुमूद यांच्यासह एकत्र वास्तव्यास आहेत. झांबा यांचे पोलनपेठमध्ये मोनीका ट्रेडर्स नावाचे दुकान असून शाम व सुरजमल हे दोन्ही भाऊ दुकान सांभाळतात. १२ ऑक्टोंबर रोजी शाम झांबा, त्याचे वडील तसेच भाऊ नेहमीप्रमाणे दुकानावर गेले होते. तर दुपारी ३ वाजेच्या सुमारास झांबा यांच्या आई व इतर महिला खरेदीसाठी गावात गेल्या होत्या. महिला खरेदीनंतर पावणे पाच वाजेच्या सुमारास घरी परतल्या असत्या, त्यांना घराचा आतील व मुख्य दरवाजा दोन्हीचे कुलूप तुटलेले दिसले. तर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. कपाटाचे लॉकरही तुटलेले तर कपाटातील सामान ही घरात अस्ताव्यस्त पडलेला दिसला. घरातील लोखंडी तसेच लाकडी कपाटातील एकूण २५ हजार रुपये रोख , १६ हजार रुपयांची ४ ग्रॅमची सोन्याची अंगठीही कपाटातून गायब असल्याचे दिसून आले. चोरीची खात्री झाल्यावर झांबा यांनी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रोकडसह दागिणे असा एकूण ४१ हजारांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















