जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा परिषदमध्ये विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त असताना अनुकंपा नियुक्ती दिली जात नसल्याच्या विरोधात अनुकंपाधारकांनी न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनुकंपाधारक गेल्या नऊ ते दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून नोकरीपासून वंचित आहेत. यातील बरेच अनुकंपाधारक वयोमर्यादेत बाद होण्याच्या मार्गावर आहे. नोकरी नसल्याने अनुकंपाधारक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्हा परिषदमध्ये विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त असताना अनुकंपा नियुक्ती दिली जात नाही. त्यामुळे अनुकंपा प्रतिक्षा यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक वेळा निवेदन देवून व भेटी घेवूनही प्रशासनाला जाग आली नाही. दि. ३० जुलै २०२० रोजी वित्त विभागाच्या शासन निर्णणान्वे अनुकंपा पदभरतीवर कोणतेही निर्बंध नाही असे सांगितले आहे. व दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार सरळ विविध संवर्गातील रिक्त पदांना अनुसरून २० टक्के पदभरती करण्यास शासनाने स्पष्ट सांगितले आहे. तरी देखील जि. प. जळगाव यांनी २९ ऑगस्ट २०२० रोजी दहा टक्के पदांनी कार्यवाही स्तरावरून सुरु केलेली नाही असे दिसून येत आहे. यामुळे सर्व अनुकंपाधारक न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषणास बसलेले आहोत. दरम्यान, अनुकंपाधारकांची उपोषणाची दखल न घेतल्यास सर्व अनुकंपाधारक न्यायालयात न्याय मागणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.