जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात किमान तापमान घसरल्याने शहरासह संपूर्ण जिल्हा गारठला आहे. जळगाव शहराच्या किमान तापमानाने मागील पाच वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वात कमी सात अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद मंगळवारी जळगावमध्ये झाली.
तापमानात मोठी घट झाल्यामुळे जळगावकरांना हुडहुडी भरली असून, याचा परिणाम जनजीवनावर देखील झालेला पहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात अरबी व बंगालच्या महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून तापमान नेहमीपेक्षा कोरडे असून उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. थंडीची लाट आगामी आठवडाभर कायम राहण्याची शक्यता असून पुढील काही दिवस पारा १० अंशांपेक्षा खाली राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.