
कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) – कासोदा पोलीस ठाणे हद्दीच्या शिवारातील शेतातून १८ मेंढ्या व ५ बोकड चोरीस गेल्यानंतर कासोदा पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर चोरीच्या गुरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.
कासोदा शिवारातील गट नं. ४४४/२ मधील शेतातून ३ रोजी सायंकाळी ५.३० ते ४ सप्टेंबरच्या सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी १८ मेंढ्या व ५ बोकड चोरून नेले होते. या संदर्भात शेतकरी सुरेश पीतांबर क्षीरसागर यांनी कासोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक तपास तसेच पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडी येथील संशयित अजय राजू चौहान (रा. साईखेडी) व सोहन विश्वराम ब्राह्मणे (रा. बडी) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांकडून चौकशीत इतर आरोपींची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्यात येत आहे. तपास प्रभारी अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि. किशोर पाटील, पो. हे. कॉ. किरण गाडीलोहार व पो.हे.कॉ. योगेश पाटील करत आहेत.
















