धरणगाव (प्रतिनिधी) येथे माळीवाडा, भोईवाडा, लोहार गल्ली आणि बडगुजर गल्ली परिसरात महावितरणचे विजचोरी शोध पथक गेल्या तीन दिवसांपासून कार्यरत होते. मात्र, या पथकावर मिटर फॉल्टीच्या नावाखाली गरीब लोकांकडून वसुली केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिटर फॉल्टीच्या नावाखाली अनियमित वसुली
धरणगावातील काही नागरिकांनी सांगितले की, ज्या लोकांकडे नियमित वीज बिल भरण्याची क्षमता नाही, त्यांना 16,000, 25,000, 10,000 ते 12,000 रुपयांपर्यंतच्या मोठ्या रकमेची बिले दिली जात आहेत. वितरण कंपनीकडून लावण्यात आलेले जीनस कंपनीचे मीटर खूपच संवेदनशील असून, मोबाईल चार्जर लावल्यावरही ते फिरू लागतात. नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे की, पूर्वीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटरच्या तुलनेत सध्याचे मीटर अनियमित मोजमाप करतात, ज्यामुळे बिले जास्त येत आहेत.
गरीबांवर कारवाई, मोठ्या कंपन्यांना सूट?
स्थानिक नागरिकांच्या मते, महावितरणकडून मोठ्या कंपन्यांकडे दुर्लक्ष करून गरीब नागरिकांना लक्ष केले जात आहे. स्टोन क्रेशर आणि इतर मोठ्या कंपन्यांकडून वसुली टाळली जाते, तर सामान्य नागरिकांवर मोठ्या रकमेच्या बिलांचा बोजा टाकला जातो.
स्थानिकांचा विरोध
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या धरणगावातील 400-500 महिला, युवक, तसेच महायुतीचे कार्यकर्ते पथकाला विरोध करण्यासाठी एकत्र जमले. परिस्थिती चिघळण्याआधीच पथकाला तेथून पाठवण्यात आले.
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा इशारा
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संजय महाजन, धीरेंद्र पुरभे, विनोद बयस, विशाल महाजन, पवन महाजन, समाधान महाजन, जयेश बडगुजर, पंकज महाजन आणि इतर नेत्यांनी महावितरणला इशारा दिला की, गरीब नागरिकांवर अनावश्यक बोजा टाकला जाणार नाही. जर शेतकऱ्यांवर किंवा कामगारांवर अन्याय केला गेला, तर महायुतीच्या सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि याला वितरण कंपनी जबाबदार असेल.
वीज बिलाच्या तक्रारींची चौकशीची मागणी
अनियमित बिले आणि अंदाजे दिलेल्या वसुलीमुळे निर्माण झालेला अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी स्थानिकांनी तक्रारींची चौकशी करण्याची मागणी केली आहे.