
जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र-२०२६’ प्रदर्शनात परिणामकारक मांडणी व ग्राहकांशी प्रभावी संवाद साधल्याबद्दल महावितरणच्या स्टॉलचा ‘बेस्ट स्टॉल’ म्हणून गौरव करण्यात आला. अमळनेर येथे आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वतीने एकूण ७५ स्टॉल उभारण्यात आले होते. यात स्टॉलची उत्कृष्ट मांडणी आणि ग्राहकांशी प्रभावी संवाद केल्याबद्दल महावितरणच्या स्टॉलचा गौरव करण्यात आला.
खासदार स्मिता वाघ, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, पारोळा – एरंडोलचे आमदार अमोल पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट स्टॉलचा पुरस्कार मिळवणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सांघिक कार्यालयातील उपमुख्य जनसंपर्क अधिकारी प्रवीण स्थूल, अमळनेरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महावितरणच्या दालनात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसह स्मार्ट मीटरच्या फायद्याची माहिती देण्यात आली. तीन दिवसांत जवळपास १२ हजारांहून अधिक नागरिकांनी महावितरणच्या स्टॉलला भेट दिली. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल उभारण्यात आला. धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, जळगाव परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड, उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, सहायक अभियंता हितेंद्र बढे, मनोज वाडिले, विनायक बोरसे, हेमंत सैदाणे, नितीन ठवकर, मोहन नेवाळे, भाऊसाहेब महाजन, तंत्रज्ञ दीपक अहिरे, सुषमा हजारे यांनी प्रदर्शनादरम्यान ग्राहकांना सर्व योजनांची माहिती दिली. तसेच विद्युत सुरक्षा व वीजबचतीबाबत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यावेळी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. दालनात ग्राहकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्यात आली.















