चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील युनियन बँकेच्या एसटीएममधून ५ ग्राहकाचा एटीएम पिनकोड वापरून तसेच डुप्लीकेट चिप टाकून त्याद्वारे सुमारे २ लाख ७ हजार १० रूपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ग्राहकाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील तरवाडे पेठ येथील संभाजी भाऊराव पाटील या तरुणाचे कॅनडा बँकेत खाते आहे. कॅनडा बँकेचे गावात एटीएम नसल्याने पैसे काढण्यासाठी १३ रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान ते चाळीसगावातील भडगाव रोडवरील अभिनव शाळेसमोर असलेल्या युनीयन बँकच्या एटीएममध्ये गेले होते. कॅनडा बँकेच्या एटीएमने पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे एटीएम कार्ड हे एटीएम मशिनमध्ये अडकले. बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही ते कार्ड निघत नव्हते. याचवेळी एटीएमच्या बाजुलाच एक अनोळखी व्यक्ती उभा होता. त्याने एटीएम मशीनवर असलेला हेल्पलाईन क्रमांक ८८५९९४४८७० या नंबरचा कागद चिकटवलेला असून त्यावर संपर्क केला, तर तुम्हाला मदत मिळेल, असे संभाजी पाटील यांना सांगितले. पाटील यांनी त्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन लावला असता पलीकडून एकाने बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. तसेच मी आता बाहेर असुन तुम्ही आता तुमचा पिनकोड टाकून बघा, तुमचा पिन टाकल्यावर कार्ड बाहेर येईल. नाहीतर मी संध्याकाळी ७ वाजता आलो की, तुमचे एटीएम कार्ड काढुन देतो, असे सांगत आज रविवार असल्याने बँक बंद असल्याची बतावणी केली. दरम्यान, पिनकोड टाकूनही एटीएम कार्ड न निघाल्याने संभाजी पाटील हे एटीएममधून बाहेर पडले. सायंकाळी ७ वाजता ते पुन्हा तेथे आले. त्यावेळी त्यांच्यासारखेच आणखी काही एटीएम कार्डधारकांचे एटीएम कार्ड युनीयन बँकेच्या मशीनमधे अडकल्याचे त्या नागरिकांनी सांगितले. यात टाकळी प्र.चा. येथील ज्ञानेश्वर मधुकर पवार यांच्या खात्यातून ४२ हजार १० रूपये, संभाजी पतिंगराव पाटील यांच्या खात्यातून ३० हजार रूपये, नितेश अशोक पाटील यांच्या खात्यातून ५ हजार रुपये तर म्हाळसा पिंपळगाव येथील गणेश रवींद्र पाटील यांच्या खात्यातून १७ हजार रूपये अकांउंट वरुन पैसे काढल्याबाबत मोबाईलवर मेसेज आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे संभाजी पाटील घाबरले. आपल्याही खात्यातून पैसे काढल्याचे त्यांना संशय आला. त्यातच त्यांचे बँक खात्याला त्यांना मोबाईल क्रमांक संलग्न केला नसल्याने त्यांना तेव्हा काहीही समजले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या ग्राहकांच्या एटीएम खात्यातून पैसे काढले गेले, त्यांनी युनियन बँकेत धाव घेत हा प्रकार सांगितला. तेथील कर्मचाऱ्यांनी नाशिक येथून आमचे टेक्निशियन येतील, त्यावेळेस खरे काय ते समजेल, असे सांगितले.
यंत्रात मिळाले नाही एटीएम कार्ड
दरम्यान, संभाजी पाटील यांनी कॅनडा बँकेत धाव घेत अकांउंटवरुन पैसे काढल्याबाबत विचारले असता कर्मचाऱ्याने त्यांचे बँक स्टेटमेंट तपासले. यात १३ रोजी एटीएम अडकल्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख १३ हजार रुपये काढल्याचे समोर आले. त्यानंतर संभाजी पाटील यांनी पुन्हा युनियन बँकेत मॅनेजर व कर्मचाऱ्यांना माझे पैसे काढल्याचे स्टेमेंट दाखवले. तर त्यांनी आम्ही एटीएम मशीन उघडून पाहिले असता त्यात कोणाचेही एटीएम कार्ड अडकलेले नसल्याचे सांगितले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संभाजी पाटील यांच्यासह इतरांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.नि. अमितकुमार मनेल करत आहेत.
















