जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून झाल्याची घटना समोर आली आहे. एक घटना ही तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात उपसरपंच या तरुणाचा किरकोळ वादातून निर्घुण खून केल्याची घडली. तर दुसरी घटना भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंड असलेल्या तरूणाची क्रूर हत्या करून गाडून टाकण्यात आले.
तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात ३५ वर्षीय माजी उपसरपंच या तरुणाचा किरकोळ वादातून निघून खून झाल्याची घटना शुक्रवार दि.२१ रोजी सकाळी ८ वाजता कानसवाडा शिवारातील शेतात घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असुन या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
३१ डिसेंबर रोजी युवराज कोळी याचे ढाब्यावर भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील या तिघांसोबत वाद झालेला होता. त्यानंतर याच कारणावरून गुरुवारी २० मार्च रोजी रात्री १० वाजता युवराज कोळी आणि भरत पाटील यांच्यात वाद झाला. हा वाद रात्री नातेवाईकांच्या मदतीने मिटवण्यात आला होता. कोरोना काळात २०२१-२२ मध्ये युवराज कोळी हे कानसवाडा येथे उपसरपंच होते. त्यावेळी भरत पाटील व त्यांचा मुलगा परेश पाटील हे त्यांचे परमिट रूम वेळे पेक्षा जास्त वेळ सुरू ठेवत असल्याने त्यांना बोलण्यास गेलेल्या उपसरपंच युवराज कोळी यांचा संशयितांशी वाद झाले होते. झाले होते. त्यांनतर देखील त्यांच्यात वाद झाले. तसेच दि. २० रोजी देखील त्यांच्यात वाद झाले. या प्रकरणाला ठेकेदारीची देखील किनार असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास युवराज कोळी हा त्याची आईवडील यांच्यासोबत कानसवाडे शिवारातील शेतात काम करत होता. त्यावेळी संशयित आरोपी भरात पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील, हरीश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी याच्यावर वार केले. दरम्यान छातीवर केलेल्या गंभीर वारमुळे युवराज जागेवरच कोसळला.
भुसावळ येथे सराईत गुंड मुकेश भालेरावची हत्या
शहरातील टेक्निकल हायस्कूल मागे राहणाऱ्या मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द ही केले होते. यातून बाहेर आल्यानंतर मुकेश भालेराव हा भुसावळ येथेच वास्तव्याला होता. दरम्यान, सुमारे चार दिवसांपूर्वी मुकेश भालेराव याला घरून काही तरूण घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेऊन ही तो न मिळाल्याने आज सकाळी भालेराव याची पत्नी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. दरम्यान, आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मुकेश भालेराव याचा खून करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुकेश भालेराव याचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुकेश भालेराव याच्या खुनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या कृत्यामागे पूर्व वैमनस्य असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुकेश भालेराव याची टोळी असून त्यांच्यावर तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याची हत्या ही टोळीयुध्दातून झाल्याची शक्यता ही व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपासातून यातील सत्य समोर येणारच आहे. या खुनामुळे भुसावळात मध्यंतरी बंद झालेले टोळी युध्द पुन्हा सुरू झाले की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
पूर्व वैमनस्यातून हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली व खून उघडकीस न येण्यासाठी तापी नदीजवळील निर्जनस्थळी पुरण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी खुनाचा हा गुन्हा उघडकीस आणला.