भुसावळ (प्रतिनिधी) घर कामासाठी ठेवलेल्या नाशिक येथील पंधरा वर्षीय मुलीस मारहाण केल्याप्रकरणी भुसावळमधील एका दांपत्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. सिंधी कॉलनीतील नरेश आणि राधा आठवणी असे मारहाण करणाऱ्या दांपत्याचे नाव आहे.
पीडित मुलीचा परिवार नाशिक येथे राहतो. तिला पाच बहिणी व दोन भाऊ आहेत. मोठी बहिण पुणे येथे घरकार करते, दुसऱ्या क्रमांकाची नाशिक जेलमध्ये बंद आहे. तिसऱ्या क्रमांकाची पीडिता नाशिकमधील एका शाळेत नववीचे शिक्षण घेत होती. मात्र, ५० हजार रुपये घेऊन पालकांनी तिला भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील नरेश आठवणी यांच्याकडे घर कामासाठी सोडले. दोन वर्षांपासून ही मुलगी आठवाणी यांच्याकडे घरकाम करत आहे. गेल्या महिन्यात तिने आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, राधा आठवाणी यांनी नकार दिला. २ सप्टेंबरला मुलगी घरातील बाथरूम साफ करत होती. यावेळी राधा आठवणी यांनी स्टाइल्स का घासल्या नाहीत? अशी विचारणा करत मारहाण केली. यानंतर अल्पवयीन मुलीने घराबाहेर पडून रस्त्याने पळ काढला. यादरम्यान पोलिसांनी थांबवून विचारपूस केल्याने झालेला प्रकार समोर आला.