हिंगोली (वृत्तसंस्था) किरकोळ कारणावरून वादातून जावयाने सासूचा खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी ता. 16 दुपारी आखाडा बाळापूर येथे घडली आहे. या घटनेत पत्नी व भाचीलाही मारहाण करून जखमी झालीय. लताबाई नागोराव खिल्लारे (50) असे मयत महिलेचे नाव आहे.
जालना जिल्हयातील बदनापूर भागातील अजय सोनुळे हा मागील दोन वर्षापासून पत्नीसह आखाडा बाळापूर येथील त्याच्या सासुरवाडीत राहतो. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अजय आणि त्याची सासू लताबाई नागोराव खिल्लारे यांच्यात प्लॉटसाठी पैसे मागण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात अजयने बाजेचा ठावा हातात घेऊन पत्नी सोनी सोनुळे भाची समीक्षा पाईकराव व सासू लताबाई खिल्लारे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीमध्ये लताबाई यांच्या डोक्यात जोरात घाव बसल्याने त्या जागीच कोसळल्या. तर सोनी व समीक्षा दोघीही जखमी झाल्या. आरडा ओरड झाल्यानंतर शेजारी घटनास्थळी धावले. परंतू तोपर्यंत आरोपी अजयने पळ काढला होता.
यानंतर पोलिसांच्या पथकाला घटनेची मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांनीही उपचारासाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून तिघींना नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र, रस्त्यातच लताबाई खिल्लारे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेतील फरार अजय सोनुळे यास पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकाने आखाडा बाळापूर ते वारंगा रस्त्यावर तसेच शेतात शोध मोहिम सुरु केली. यामध्ये कुर्तडी फाटा शिवारात आरोपी अजय सोनुळे हा पोलिसांच्या हाती लागला आहे.