जळगाव (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रेवश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकारणावर मोठे परिणाम दिसू लागले आहेत. तथापि, भाजपाने तातडीची बैठक बोलावली असतांना एकनाथ खडसे यांची सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी आज जळगाव येथे भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष यांसह आदींची उपस्थिती होती. मात्र, खासदार रक्षा खडसे बैठकीला अनुपस्थित होत्या. बैठकीबाबत माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले की, आजची कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्याचे काम राहिले आहे. त्यामुळे ही कार्यकारिणी गठीत करण्याआधी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. आता जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा घेतला जाणार आहे आणि कार्यकारिणी जाहीर होणार आहे. पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी चाचपणी सुरू आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
भाजप हा व्यक्तीसापेक्ष पक्ष नसून विचारांवर चालणारा पक्ष आहे. एकनाथ खडसेंच्या पक्ष बदलल्याने भाजपात कोणतेही खिंडार पडणार नाही. कोणताही खासदार, आमदार पक्ष सोडून जाणार नाही असेही गिरीश महाजन म्हणाले. खासदार रक्षा खडसे यांच्या अनुपस्थितीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, खासदार खडसे या पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्या बैठकीला हजर राहू शकल्या नाहीत, असे महाजन म्हणाले.