अमळनेर (प्रतिनिधी)
मुंबई- नाशिक महामार्गावर १५ जानेवारी रोजी पहाटे ३.३४ वाजता पाच वाहनांचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा समावेश होता. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यात एक मुलगी जखमी असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मयतांमध्ये दोघे अमळनेरचे आहेत. अमळनेर तालुक्यातील मारवड इथे दहावीच्या वर्गातील गेट टुगेदरसाठी गावी आलेल्या पियुष सोनवणे आणि वृंदा सोनवणे-पाटील या पती-पत्नीचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पाच वर्षांची मुलगी कृष्णाली वाचली.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणि दहावीच्या बॅचचं गेट टू गेदर दोन्ही एकत्र आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही कार्यक्रम एकत्र उरकूनच सोनवणे दाम्पत्यांनी कामासाठी उल्हासनगरला परत जाण्याचा निर्णय घेतला. शाळेतील आठवणी आणि जुन्या किस्स्यांमधून एक वेगळं समाधान मिळवण्याचा आनंद त्यांना होत होता. सर्व काही सुरळीत पार पडलं, दहावीच्या गेट टू गेदरचा आनंद घेत, गप्पा आणि आठवणींमध्ये बुडालेलं असतानाच सोनवणे दाम्पत्य परतीच्या प्रवासाला निघाले.
आई-वडिलांचे छत्र हरवले
अमळनेरहून मुंबईकडे जात असताना, रात्रीच्या तीन वाजता, त्यांच्यासोबत एक भीषण अपघात घडला. ते ज्या ट्रॅव्हल्सने प्रवास करत होते, त्याच गाडीचा मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात समावेश होता. कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात एकमेकांना धडकल्यामुळे हा भीषण अपघात घडला. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मारवड इथल्या पियुष सोनवणे आणि वृंदा सोनवणे-पाटील या पती-पत्नींचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. या अपघातातून त्यांची पाच वर्षांची मुलगी कृष्णाली थोडक्यात बचावली. तिला मात्र गंभीर जखम झाली असून तिच्या हाताला फॅक्चर झालं आहे. कृष्णालीने आपल्या आई-वडिलांचे छत्र हरवले आहे.
सोनवणे-पाटील कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
सोनवणे दाम्पत्य मागील चार दिवसांपासून दहावीच्या बॅचच्या गेट टुगेदरसाठी आपल्या मारवड गावी आले होते. या काळात त्यांची मित्र-परिवार आणि नातलगांची भेट शेवटची ठरली. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे सोनवणे-पाटील कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेट टू गेदरच्या आठवणींनी आनंदाने भरलेले असलेले हे दाम्पत्य अचानक काळाच्या धडाक्याने आपले जीवन गमावून गेले. हे दाम्पत्य उल्हासनगरमधील रहिवासी होते. पीयूष पाटील मुंबईतील बीएमसी मध्ये नोकरी करत होते, तर वृंदा पाटील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कुटुंबातील ही अपघाताची शोकांतिका सर्वांच्या मनावर गडद छाया सोडून गेली आहे.