जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला. तेथून चोरट्यांनी ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. एका उच्चभ्रू वस्तीमध्ये ही धाडसी चोरी झाल्याच्या घटनेमुळे आमदारांचे निवासस्थान असुरक्षीत असल्याचे उघड झाले असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरु आहे.
खडसे कुटुंबिय गेले बाहेरगावी
दिवाळी असल्यामुळे खडसे हे आपल्या मूळ गावी गेले होते. त्यानंतर घटनेच्या दिवशी खडसे कुटुंबीय बाहेरगावी होते. एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मुंबईला, कन्या रोहिणी खडसे – खेवलकर या पुणे येथे व सून, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या दिल्ली येथे गेलेल्या असल्यामुळे याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कोणीही आले नव्हते.
बेडरुम मधील साहित्य फेकले अस्ताव्यस्त
बंगल्याची देखरेख करणारे देशमुख यांनी कंपाऊंटचे कुलूप उघडून ते मुख्य दरवाजा उघडण्याकरीता गेले. यावेळी त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा कापून दरवाजा ओढून बंद केल्याचे दिसले. त्यांनी बंगल्यात जावून पाहणी केली असता, त्यांना बेडरुमधील दोन्ही कपाट उघडे होते व सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते.
रोकडसह सोने-चांदीचे दागिने नेले चोरुन
घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर चेतन देशमुख यांनी लागलीच तेथे राहणारे गोपाळ सरोदे यांना माहिती दिली. सरोदे हे घटनास्थळी आल्यानंतर घरात काय साहित्य होते याची खात्री केली. त्यांनी बंगल्यातील संपुर्ण साहित्याची पाहणी केल्यानंतर त्यांना बंगल्यातून रोकडसह सोने चांदीचे दागिने चोरुन नेले.
श्वानाने काढला चोरट्यांचा माग घरफोडी झाल्याची माहिती
मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाह यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर श्वान व ठसे तज्ज्ञांचे पथकाने घटनास्थळाहून पुरावे संकलीत केले तर श्वानाने देखील बंगल्यापासून काही अंतरापर्यंत माग काढला.
चोरटे तासभर बंगल्यात होते थांबून
शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या शिवराम नगरात अनेक उद्योजक, व्यावसायीक व अधिकाऱ्यांचे निवास्थान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे तब्बल पाऊण ते एक तास बंगल्यात चोरी करीत होते. मात्र कोणालाही समजले देखील नाही. तसेच रात्रीच्या वेळी पोलिस गस्तीवर देखील असतात, परंतू अशा उच्चभ्रू भागात पोलिस गस्तीवर येत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
चोरट्यांनी चोरुन नेला ऐवज
चोरट्यांनी खडसे यांच्या बंगल्यातून ८० हजारांची दोन तोळ्याची पोत, १६ हजारांची चार ग्रॅम अंगठी, ४० हजारांचा एक तोळ्याचा गोफ, ८० हजारांचा दोन तोळ्याच्या चार अंगठ्या, ५० हजारांची एक किलोची वजनाचे कानातील रिंग, १२ हजारांचे तीन ग्रॅम वजनाचे कानातील रिंग, १६ हजारांचे चार ग्रॅमचे कर्णफुले, १२ हजारांचे तीन ग्रॅमच्या अंगठ्या, १६ हजारांचे चार ग्रॅमची चांदीची गदा, ५० हजारांची एक चांदीचे त्रिशूल, १ लाख रुपयांचे दोन किलोचे चांदीचे त्रिशूल, ३ हजारांचे रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट, १ लाखांचे २ किलो चांदीचे रथ, आणि ३५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
 
	    	
 
















