
लोहारा, ता. पाचोरा (प्रतिनिधी) – येथे दि.२४ सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सहा घरांसह दोन दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कुऱ्हाड मोहल्ला भागातील शेख जमील अहमद सुभानगनी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटामधील सोन्याचे दोन हार, चांदीचे दागिने, अंगठी आणि १ लाख २४ हजार ५०० रुपये रोख असा सुमारे पाच ते सहा लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीनंतर चोरट्यांनी घराला बाहेरून कडी लावून पोबारा केला. तसेच फारूक शेख नबी यांच्या किराणा दुकानातून लवंग मिरे, मसाले, दहा किलो मिरची पावडर व रोख रक्कम चोरीस गेली. अन्य काही बंद घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले.
शेतात चोरीच्या मालाची वाटणी
चोरी केल्यानंतर चोरट्यांनी नाचणखेडा रस्त्यावरील अर्जुन नत्थू माळी यांच्या शेतात जाऊन चोरीच्या वस्तू व रोख रकमेची वाटणी केल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आले. केळीच्या पानांवर पैसे व वस्तू ठेवून वाटणी केल्याचे दिसून आले. काही वस्तू व रक्कम तेथेच सोडून चोरट्यांनी पळ काढला.
दरम्यान, ‘बच्चो का बँक’ असे लिहिलेल्या दहा, वीस व पाच रुपयांच्या नोटा, चोरी केलेल्या घरांचे कुलूप, चाव्या व डबा शेतात फेकून दिल्याचेही आढळले. रात्रीच्या गस्तीसाठी पोलिस व्हॅनची मागणी लोहारा पोलीस दूरक्षेत्रांतर्गत १७ गावांसाठी केवळ चार पोलीस कर्मचारी असल्याने रात्रीच्या गस्तीची अडचण निर्माण होत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांनी सांगितले. रात्री गस्तीसाठी स्वतंत्र पोलिस व्हॅन उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री कुऱ्हाड मोहल्ला परिसरात संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसली असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी आवाहन केले आहे.
श्वानपथकाने शोधला चोरीचा मुद्देमाल
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक, श्वानपथक व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. ७ ते ८ घरांची पाहणी करून ठसे व अन्य नमुने घेण्यात आले. श्वानाने चोरी झालेल्या घरापासून शेताच्या दिशेने माग काढला. पुढे एका शेतात चोरी केलेल्या कपाटाचा ड्रॉवर व पर्स सापडली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपास सुरू आहे.
















