धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे अनेकांना अडचणी आल्या असून या पार्श्वभूमिवर वर्ल्ड व्हिजन इंडिया यांनी केलेले समाजकार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे. या संस्थेने कोरोनाच्या काळात विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मदत केली असून भविष्यातही या संस्थेने अशाच प्रकारे गरजूंच्या पाठीशी उभे रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्रतापराव पाटील आणि अनिल पाटील यांनी याप्रसंगी ५१ हजार रूपयांची मदत जाहीर केली. जीवनावश्यक वस्तू मिळाल्यानंतर गरजूंच्या चेहर्यांवरील आनंदातून आपल्याला खरे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेतर्फे पाळधी येथे गरजूंना मदत वितरण करतांना ते बोलत होते.
वर्ल्ड व्हिजन इंडिया ही संस्था समाजातल्या तळागाळातील जनतेच्या उत्थानासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे धरणगाव तालुक्यातील गरजू जनतेला विविधांगी मदत प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नितीन देवरे, एकात्मक बालविकास अधिकारी संजय धनगर आदी मान्यवरांंची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात वर्ड व्हिजनचे अनिल बल्लूरकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील वंचित कुटुंबाचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी व शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना देखील सर्वोतोपरी मदत देण्याचे काम वर्ड व्हिजन करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय बागुल यांनी केले तर आभार वर्ड व्हिजनचे रतीलाल वळवी यांनी मानले.
या वर्षी धरणगाव तालुक्यात १ कोटी ७१ लाखाचा निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मागणीनुसार मंजूर केला असून यातील २३ गावांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात २ – ३ गावातील पात्र लाभार्थ्यांना आजच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , तहसीलदार नितीनकुमार देवरे व वर्ड व्हिजनचे अनिल बल्लूरकर यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी टहाकळी बाल ग्रुप, व इतर विद्यार्थांनी गीते व बाल नृत्य सादर उपस्थितांची मने जिंकली त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
वर्ल्ड व्हिजन इंडिया कंपनीने धरणगाव तालुक्यातील ७५० कुटुंबांना प्रत्येकील ३५०० रूपयांचे असे एकूण २६ लक्ष २५ हजार रूपयांचे धान्य वाटप केले. ११९५ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी ७५० रूपयांचे असे एकूण ९ लक्ष २५ हजार रूपयांचे धान्य वाटप करण्यात आले. ६३ कुटुंबांना प्रत्येकी १५७५ रूपये मूल्य असणार्या एकूण एक लक्ष रूपयांचे सौर कंदील प्रदान करण्यात आले. अडीचशे कुपोषीत बालकांसाठी प्रत्येकी तीन हजार असे एकूण साडे सात लक्ष मूल्य असणार्या धान्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील २० अंगणवाड्यांना एक लक्ष रूपयांच्या बेबी चेअर्सचे वाटप करण्यात आले. याच्या जोडीला १२५० विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ४६० रूपये मूल्य असणारा दप्तर, बॅग व डबा देण्यात आला असून यांचे एकत्रीत मूल्य ११ लक्ष ५० हजार इतके होते. ८४५ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी ७७५ रूपये मूल्य असणार्या एकूण ११ लक्ष ५० हजार रूपयांच्या खेळण्यांचे वाटप करण्यात आले. तर, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तालुक्यात वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून ही रोपे देखील वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे देण्यात येत आहेत.
यावेळी तहसीलदार नितीनकुमार देवरे,वर्ड व्हिजनचे मॅनेजर अनिल बल्लूरकर, विजय राऊत, रतीलाल वळवी, एकात्मिक बाळ विकास अधिकारी संजय धनगर, माजी सभापती अनिल पाटील, प्रकाश पाटील, विजेश पवार, शिक्षक सेनेचे नाना पाटील, एकलग्न, वराड, पोखरी तांडा, फुलपाट, तहकळी, वंजारी खापाट, जंभोरा, बिलखेडे भोणे, सार्वे पिंपळे, साकरे, कंडारी, निशाणे येथील सरपंच, पोलीस पाटील व पदाधिकारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.