चाळीसगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट सहीचे जॉईनिंग लेटर देऊन एका २२ वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार चाळीसगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गीता प्रल्हाद कापडणे (वय २२, रा. सायगाव) या तरुणीला मंत्रालयात क्लर्कच्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. सर्वेश प्रमोद भोसले याने तिला दिनांक १ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर बनावट जॉईनिंग लेटर दिले. या लेटरवर मुख्यमंत्री फडणवीस यांची नकली सही होती.
गीता कापडणे यांच्या नातेवाईकांनी त्यांना हे जॉईनिंग लेटर दाखवले असता त्यांनी या लेटरच्या वैधतेवर संशय व्यक्त केला. सामान्य शासकीय प्रक्रियेनुसार मुख्यमंत्री जॉईनिंग लेटरवर सही करत नाहीत; ही जबाबदारी संबंधित सचिव किंवा विभाग प्रमुखांची असते, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर गीता कापडणे यांनी सर्वेश भोसले याला याबाबत जाब विचारला असता त्याने कबुली दिली की खडकी (ता. चाळीसगाव) येथील स्वामी ग्राफिक्स या दुकानावर स्वामी रणजीत मांडोळे यांच्या मदतीने गुगल क्रोमवर “cm officer letter maharashtra” असे सर्च करून मुख्यमंत्री फडणवीस यांचे लेटरपॅड डाउनलोड केले. त्यावर बनावट मजकूर तयार करून त्यावर फसवणूक करणारे जॉईनिंग लेटर तयार करण्यात आले होते.
याप्रकरणी गीता कापडणे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सर्वेश प्रमोद भोसले, स्वामी रणजीत मांडोळे, तसेच तुषार ऊर्फ रोहीत मधुकर बेलदार (रा. तांबोळे, ता. चाळीसगाव) या तिघांविरुद्ध कलम ३३६ (२), ३३६ (३), ३३६ (४), ३४० (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.