मुंबई (वृत्तसंस्था) काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असे वाटते की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनी सोबत बोलत होते.
एबीपी माझाशी बोलताना फडणवीस म्हणाले की, जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसेही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसे मारायचे सुरु होते. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केले आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचे काम करणारे यशस्वी होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्यदैवत आहेत. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा आहे. त्यामुळे यांच्यात कोणी फूट पाडू नये. कोणी नेतृत्व करावे यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतायत अशी परिस्थिती असू नये,असेही फडणवीस म्हणाले.