
चोपडा (प्रतिनिधी) – सन २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये पोलिस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी गणेश मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गणेश मंडळांच्या उपक्रमांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार, गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी कोणत्याही मंडळाने डीजे अथवा मोठ्या आवाजाची ध्वनियंत्रणा वापरू नये. गणेश मंडपाचा आकार रस्त्याच्या रुंदीच्या मर्यादेत ठेवावा. गणेशमूर्ती, मंडप तसेच मिरवणुकीदरम्यान येणाऱ्या जनावरांच्या संरक्षणाची जबाबदारी मंडळाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनी घ्यावी.
गणेश मंडपासाठी कायदेशीररीत्या वीज कनेक्शन घेणे, आग प्रतिबंधक उपाययोजना करणे तसेच आवश्यक ठिकाणी वाळू व पाण्याची व्यवस्था ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडपातील विद्युत जोडणी तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घ्यावी. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर, बॅटरी आदी साधने उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ध्वनिप्रदूषणाबाबतही पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रुग्णालये, दवाखाने, शैक्षणिक संस्था, न्यायालये व शासकीय कार्यालयांच्या परिसरात ध्वनिक्षेपकांचा वापर टाळावा. गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत स्वयंसेवकांनी मद्यसेवन करून सहभागी होऊ नये, असेही बजावण्यात आले आहे.
मंडपात किंवा परिसरात संशयित बेवारस वस्तू, स्फोटकासारखी वस्तू अथवा संशयास्पद साहित्य आढळल्यास त्याला हात न लावता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. मिरवणुकीदरम्यान सुरक्षित अंतर राखावे. तसेच गणेश मंडपाच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात कोणतेही वाहन पार्क होणार नाही, याची मंडळांनी दक्षता घ्यावी.
वर्गणी गोळा करताना नागरिक व व्यापाऱ्यांकडून ऐच्छिक स्वरूपातच वर्गणी घ्यावी. कोणत्याही व्यक्तीवर वर्गणीसाठी जबरदस्ती करू नये. गणेश मंडपाकडे पोलिसांचे वाहन, अग्निशमन दलाची गाडी तसेच रुग्णवाहिका यांना आपत्कालीन परिस्थितीत सहज पोहोचता यावे, यासाठी मार्ग मोकळा ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या व गर्दीच्या गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे रेकॉर्डिंग जतन करावे. मंडप व गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घ्यावी. गणेशमूर्ती, मंडप व परिसराच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी संबंधित गणेश मंडळाची राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी गणेशमूर्ती रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी सोडून जाणार नाही, याचीही मंडळांनी दक्षता घ्यावी. पोलिसांनी जारी केलेल्या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच ही नोटीस न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते, असा इशाराही चोपडा शहर पोलिसांनी दिला आहे.
















