
नंदुरबार (प्रतिनिधी) – वीजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले. नंदुरबार तहसील कार्यालयात कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, अधीक्षक अभियंता सायस दराडे, नंदुरबारचे तहसीलदार संतोष डेरे, कार्यकारी अभियंता अतुल गायधनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा कक्षात ग्राहकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या अंतर्गत जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी, योजनेचे आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कर्जाची सुविधा, अंदाजित खर्च यासाठी स्थानिक बँक प्रतिनिधी आणि निवडसूचीवरील सौर कंत्राटदार प्रतिनिधींशी थेट संपर्क व समन्वय करण्यात आला. कर्जाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासह सौर योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले. त्रुटींची पुर्तता करून प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली.
सेवा सेतू अभियानात नवीन घरगुती वीजजोडणी देणे, नादुरुस्त रोहित्र विनाविलंब बदलून देणे, वीज बिलावरील नावात बदल करणे, मंजूर भार बदलणे, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचे निवारण तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीज यंत्रणेमध्ये आवश्यकतेनुसार स्पेसर बसवणे, इतर तांत्रिक उपाययोजना, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती आदींना वेग देण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. सेवा सेतू व सेवा संकल्प अभियानात एकाच छत्राखाली उपलब्ध सर्व सेवा व सुविधांचा ग्राहकांनी लाभ घेतला.

















