जळगाव (प्रतिनिधी) : युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे आपल्या मतदारसंघात आमदार म्हणून स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र आता ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत, हेच दौरे जर आधी केले असते तर आज ही वेळ आली नसती. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि आमदारांचा गट बाहेर पडला नसता,अशा शब्दात गटातील आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या त्या मतदारसंघात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. जिल्ह्यात पहिली सभा बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात म्हणजेच पाचोरा या ठिकाणी होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. यावर बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, या ठिकाणी कुणी किती शक्तिप्रदर्शन केलं तरी मतं मात्र मिळू शकत नाहीत. त्यामुळे मी ‘डंके की चोट पे’ तिसऱ्यांदा निवडून येईल आणि विजयाची हॅटट्रिक करेन, असा दावा आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे समर्थकांना दिला आहे. तसेच मला मंत्रिपद मिळावं अशी अनेकांची इच्छा आहे. तशी मलाही आशा आहे. दुसऱ्या यादीत नक्की मंत्रिपद मिळेल, असं मला वाटतं आणि नाही मिळालं तरी मी मुख्यमंत्री आहे, असं मला वाटतं, असे आमदार किशोर पाटील म्हणाले.