भुसावळ/शिरपूर (प्रतिनिधी) : विहिर अनुदान मंजूर झाल्यानंतर लाईन आऊट करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर पंचायत समितीतील कृषी विस्तार अधिकार्याला धुळे एसीबीने बेड्या ठोकल्या. रविवारी दुपारी बोराडी, ता.शिरपूर येथील स्टेट बँकेजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला. योगेशकुमार शांताराम पाटील (शिरपूर) असे अटकेतील आरोपी अधिकार्याचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे मौजे बुडकी विहिर, ता.शिरपूर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आईच्या नावे सांगवी वनक्षेत्रात वन जमीन आहे. तक्रारदार यांनी आईच्या नावे वन जमिनीवर सिंचन विहिर खोदण्यासाठी सन 2023-2024 मध्ये बिरसा मुंडा कृषी कांती योजनेंतर्गत चार लाख रुपये अनुदान मंजूर होण्यासाठी 20 एप्रिल 2022 रोजी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अनुदान मंजूर झाले. शिरपूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या जागेची स्थळ पाहणी करुन तक्रारदार व त्यांच्या आईचा फोटो काढुन नेला होता. त्यावेळी कृषि विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांना विहिरीचे लाईन आउट करतेवेळी पाच हजारांची लाच द्यावी लागेल, असे सांगितल्याने 7 रोजी तक्रार नोंदवण्यात आली.
बोराडीत लाच स्वीकारताच आरोपीला पकडले
रविवार, 9 रोजी लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. बोराडी, ता.शिरपूर येथील स्टेट बँकेसमोर तक्रारदाराला लाच देण्यासाठी बोलावताच पथकाने सापळा रचला व लाच रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. संशयीताविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शना खाली लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.