जळगाव प्रतिनिधी – कंपनीच्या माध्यमातून जळगावातून कापसाच्या गाठींचा माल उत्तराखंड येथे पाठविला. मात्र संबंधितांकडून मालाची पैसे न देता शहरातील चिरायू कॉटन इंडस्ट्रीज जिनिंग फॅक्टरी उमाळे, व ओम जिनिंग अॅड प्रेसिंग फॅक्टरी म्हसावद या दोघ कंपनीच्या मालकांची तब्बल १ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार उत्तराखंडमधील एका वस्त्रोद्योग कंपनीच्या संचालकांसह तिघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रविंद्र नगरात वल्लभ सुभाषचंद्र अग्रवाल (वय ५१) हे वास्तव्यास असून त्यांची उमाळे शिवारात चिरायू कॉटन इंडस्ट्रीज नावाची जिनिंग फॅक्टरी आहे. तीन वर्षांपूर्वी ‘इंडियन कमोडिटीज डॉट कॉम’चे संचालक दिनेश हेगडे यांच्यामार्फत त्यांची ओळख बी.एस.टी. टेक्सटाईल मिल्सचे संचालक मुकेश त्यागी यांच्याशी झाली. यानंतर, सप्टेंबर २०२४ मध्ये अग्रवाल यांनी एकूण ९६ लाख ९८ हजार २८४ रुपयांचा कापूस त्यागी यांच्या कंपनीला पाठवला. महिनाभराची मुदत उलटूनही पैसे न मिळाल्याने अग्रवाल यांनी विचारणा केली असता, टाळाटाळ करण्यात आली. अग्रवाल यांनी ही माहिती त्यांचे मित्र अशोक पोरवाल यांना दिली असता, पोरवाल यांनीही याच कंपनीला दि. १८ जून २०२४ रोजी ३८ लाख ७८ हजार रुपयांचा कापूस पाठवला होता, अशी माहिती समजली, त्यांचीही रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याचे समजले.
संबधितांविरुद्ध मध्यप्रदेशातही फसवणुकीचा गुन्हा
फसवणुक करणाऱ्या मुकेश त्यागी, निखिल त्यागी आणि संगीता त्यागी यांनी अन्नपुर्णा जिनिंग फॅक्टरी यांच्यासह इतर जिनिंग फॅक्टरींकडून रुईच्या गठाणी खरेदी केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मध्य प्रदेशातील धामनोद पोलिस ठाण्यातही २ कोटी १९ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे अग्रवाल यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.