
धुळे (प्रतिनिधी) – स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करत महावितरणच्या अभियंत्यास मारहाण व जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेची पोलिसांनी केवळ एनसी (अदखलपात्र गुन्हा) नोंदवली. मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. जवळपास अडीचशे वीज कर्मचारी ठाण मांडून बसले होते. वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलल्यानंतर अखेर गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आला.
महावितरणच्या शिरपूर शहर कक्षाचे सहायक अभियंता रविंद्र दोरीक व त्यांचे सहकारी शिरपूर शहरात जुने मीटर काढून नवीन स्मार्ट टीओडी मीटर बसविण्याचे काम करत आहेत. २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दोरीक व त्यांचे सहकारी प्रधान तंत्रज्ञ अनिल शेटे, कंत्राटी कामगार भोजू कुंभार हे ईदगाहनगर येथे शेख वसिम शेख सलीम पटवे या ग्राहकाच्या प्लास्टीक भंगार गोडाऊनवर स्मार्ट मीटर लावण्यास गेले. तेथे असलेल्या शेख वसिम हा मला मीटर बदलायचे नाही असे म्हणत जोरात ओरडू लागला. त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करत सहायक अभियंता दोरीक यांच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्यांना मारहाण व शिविगाळ केली. एवढेच नाही तर आरोपी शेख वसिमने यापुढे मीटर बदलायला आले तर जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली. अनिल शेटे व भोजु कुंभार यांनी आरोपीच्या तावडीतून दोरीक यांची सुटका केली.
घटना घडल्यानंतर दोरीक यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांनी दिवसभर ताटकळत ठेवत केवळ एनसी (अदखलपात्र गुन्हा) नोंदवली. एवढ्या गंभीर प्रकरणातही दखलपात्र गुन्हा न नोंदवल्याने शिरपूर तालुक्यातील वीज कर्मचारी पोलिस ठाण्यात पोचले. त्यांनी एफआयआरची विनंती केली. मात्र पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी रात्री आंदोलन पुकारले. शिंदखेडा, दोंडाईचा येथूनही कर्मचारी आले आणि कार्यालयात ठाण मांडून बसले. गुरुवारी कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. वारंवार हल्ले होत असल्याने वीजसेवेसारखे अत्यावश्यक काम करायचे कसे असा सवाल त्यांनी केला. गुन्हा दाखल होईपर्यंत हलणार नाहीत, असा इशारा दिल्यानंतर पोलिस यंत्रणा जागी झाली. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर शिरपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपी शेख वसिमवर भारतीय न्याय संहितेच्या चार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

















