जळगाव (प्रतिनिधी) बांग्लादेशी तरुणी कोणताही व्हीसा किंवा पासपोर्ट न असतानाही जळगावमधील कुंटणखान्यावर देहविक्री करतांना पकडली गेली होती. या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री (२५ जानेवारी २०२५) दहा वाजेच्या सुमारास वस्तीगृहातील बाथरुमच्या भिंतीवरून उडी मारून ही बांग्लादेशी तरुणी पळून गेल्याची घटना समोर आली. शोध घेऊनही ती तरुणी सापडली नाही, त्यानंतर अखेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणीला एमआयडीसी परिसरातील हॉटेल चित्रकुटमध्ये अवैधपणे चाललेल्या कुंटणखान्यावर छापामारी करताना ताब्यात घेतले होते. तिच्या कडे कुठलाही पासपोर्ट किंवा व्हीसा असा कोणताही वैध कागदपत्र आढळला नाही. या प्रकरणी हॉटेल चालक व मालकासह बांग्लादेशी तरुणीविरुद्ध भारतात घुसखोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले होता. सदर तरुणीला २२ डिसेंबर २०२४ रोजी आशादीप महिला वस्तीगृहात दाखल करण्यात आले होते, परंतु २५ जानेवारी रोजी ती वस्तीगृहातून पळून गेली. सध्या तिच्या शोधासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
नाईट ड्युटीवर असलेल्यांनी परिसरात घेतला शोध
हा प्रकार नाईट ड्युटीवर असलेल्या आशादीप वस्तीगृहातील कनिष्ठ काळजीवाह मनिषा पाटील, सुरक्षा रक्षक वैशाली पाटील, महिला पोलीस परवीन तडवी यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच वस्तीगृहाच्या परिसरात त्या तरुणीचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
चौकशीनंतर पोलिसात गुन्हा दाखल
ही घटना कनिष्ठ काळजीवाहक मनिषा पाटील यांनी आशादीप वस्तीगृहाचा अतिरीक्त कार्यभार असलेल्या परिविक्षा अधिकारी सोनिया देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ वस्तीगृहात येवून चौकशी केली. त्यानंतर ते तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात गेले. सोनिया देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पळून गेलेल्या बांग्लादेशी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वस्तीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शासकीय आशादीप वस्तीगृहात चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्तासह सुरक्षा रक्षक तैनात असतात, तरी देखील बांग्लादेशी तरुणीने बाथरुमच्या भिंतीवरुन उडी मारुन ती पळून गेल्याने वस्तीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.